बाईपण भारी देवा - एका पुरुषाच्या नजरेतून

 एका पुरुषाच्या नजरेतून *बाईपण भारी देवा*



आज वेळ काढून आईला हा सिनेमा बघण्यासाठी घेऊन गेलो होतो तेव्हा आई सांगत होती की माहेरची साडीनंतर एवढी गर्दी ही याच सिनेमाला बघायला मिळाली. अशा प्रकारे सिनेमा बघण्यासाठी बायकांची संख्या तर जास्त होतीच, पण अनेक पुरुषसुद्धा हा सिनेमा बघायला अगदी उत्सुकतेने आलेत हे बघून बरं वाटलं आणि सिनेमा बघतांना सतत वाटलं, की हा सिनेमा बायकांपेक्षा पुरुषांनी जास्त बघितला पाहिजे. म्हणजे बघा ना कळत नकळतपणे आपण आपली टेंशन्स, कामाचा ताण सगळं काही बायकांवरच लादत असतो. ही गोष्ट फार कमी पुरुष मान्य करतील. असो

पण मुलगी, आई, सून, बायको आणि आजी अशी अनेक पात्र एकटी स्त्री अगदी नि:स्वार्थपणे पार पाडत असते..

आता थोडं सिनेमा विषयी बोलूयात-

ट्रेलरवरून आपल्याला कळलं होतं, की ही 6 अशा बहिणींची गोष्ट आहे  ज्यांच्या मध्ये अनेक मतभेद असूनसुद्धा त्या एका मंगळागौर स्पर्धेत भाग घेतात... पण हा भाग घ्यायच्या आधी आणि नंतर त्यांना काय काय अडचणी येतात, त्यांच्यातले मतभेत दूर होतात की नाही, हे या सिनेमात मांडलंय.. 

जया (उर्फ माई) म्हणजे रोहिणी हट्टंगडी, शशी म्हणजे वंदना गुप्ते, चारू म्हणजे दीपा परब चौधरी, पल्लवी म्हणजे सुचित्रा बांदेकर, साधना म्हणजे सुकन्या कुलकर्णी मोने आणि केतकी म्हणजे शिल्पा नवलकर.

मराठी इंडस्ट्रीतील या कसलेल्या अभिनेत्री एका स्क्रीनवर असल्यावर सिनेमा फ्लॉप होण्याची हिम्मत तरी कशी करेल...

सिनेमा बघताना मी बऱ्याचदा आईकडे बघत होतो, अनेक असे क्षण या सिनेमात होते जे बघून तिचेही डोळे पाणावले आणि इथेच केदार शिंदे जिंकले...

सिनेमाविषयी लिहायला खूप काही आहे, पण शब्द नाहीयेत. कारण आज समजलंय की हे बाईपण खरच किती भारी आहे ते.

केदार शिंदे सरांना थँक्स. कारण त्यांच्यामुळे आज सगळ्या बायका या थिएटरला येत आहेत ते फक्त हा सिनेमा बघण्यासाठी. पण मी सांगेल की बायकांसोबत पुरुषांनीसुद्धा हा सिनेमा बघावा म्हणजे त्यांना बायकांकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळेल...


-RJ सिद्धू

Comments

Popular posts from this blog

हनुमान…!!

Bollywood Balcony EP 01 Bramhastra Movie Review